छत्रपती संभाजी महाराज उत्तर आहेत !

May 14, 2020

लेखन

arvind jagapat patra

आपल्याला नेहमी जग काय म्हणेल हा प्रश्न असतो

आपल्याला नेहमी जग काय म्हणेल हा प्रश्न असतो. खूप लोक मनात असूनही बऱ्याच गोष्टी करत नाहीत. लोक काय म्हणतील ही भीती वाटत असते. आणि या भीतीला काही उत्तर नसतं. आसपास सगळेच हतबल असल्यासारखे दिसतात या प्रश्नाने. पण थोडं इतिहासात डोकावलं की जाणवतं या प्रश्नाला उत्तर आहे. संभाजी राजांचा विचार करताना नेहमी उत्तर मिळतं. सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट म्हणजे वेळ. आपल्याकडे खूप वेळ असतो. अगदी औरंगजेबासारख्या धर्मांध बादशहाला किती मोठं आयुष्य मिळालं. संभाजी राजांचा विचार केला तर त्यांना दहा वर्षांपेक्षा कमी कारकीर्द मिळाली. पण जी काही कारकीर्द होती ती अशी काही गाजवली की पराक्रमी राजा कसा असावा तर संभाजी राजांसारखा हे आज कुणीही मान्य करेल. शिवाजी महाराज काय किंवा संभाजी महाराज काय, दोघांनाही खूप कमी काळ मिळाला. या दोघानाही जर आणखी काही वर्ष मिळाली असती तर इतिहास कसा असता? ही झाली जर तरची भाषा. पण मिळालेल्या कमी वेळेचा किती मोठा सदुपयोग होऊ शकतो हे त्यांच्या उदाहरणावरून समजून घेता येईल. आपल्यापैकी खूप लोकांना वाटतं की आपण खूप काही करून दाखवलं असतं. पण पाय ओढणारे खूप आहेत. जवळच्या लोकांची मदत नाही. सतत विरोध होतो. कुणाचा पाठिंबा नाही. कुणी कौतुकाचे शब्द बोलत नाही. संभाजी महाराजांचं उदाहरण या बाबतीत बघायला पाहिजे. त्यांना जवळच्या सहकाऱ्यांचा त्रास झाला. त्यांच्याशी लढता लढता खूप वेळ आणि उर्जा गेली. पण संभाजी राजांनी कारणं पुढे केली नाहीत. लढत राहिले. लढायचं म्हणजे फक्त तलवार घेऊन नाही. समृध्द आयुष्य त्याला म्हणतात ज्यात ज्ञानाला किंमत आहे. ज्ञान मिळवण्याची उत्सुकता आहे. संभाजी राजांनी ज्ञानाला महत्व दिलं. ते उत्तम लेखक होते. संस्कृतचे जाणकार होते. खूप लोक म्हणतात ना की कामधंद्यामुळे काही वाचायला पण सवड मिळत नाही. त्यांनी संभाजी राजांच्या धावपळीच्या आयुष्यात फक्त त्यांची लेखन कामगिरी बघितली पाहिजे. खरतर त्यांचं आयुष्य फक्त धावपळीचं नव्हतं. सतत औरंगजेबासारखा शत्रू मागावर होता. भरीस भर म्हणून इंग्रज आणि पौर्तुगीज होते. मुरुडच्या सिद्दीसारखे पण वाढीव होतेच. पण तिथे लढण्यासाठी छोटा किल्ला बांधायची दूरदृष्टी असो किंवा पौर्तुगीजाना पार गोव्यापर्यंत जाऊन धमकावण्याची ताकद असो, संभाजी राजे कुठल्या कुठल्या पातळीवर लढत होते याचा विचार केला तरी आश्चर्यचकित व्हायला होतं. खुपदा आपण आयुष्यातली एखादीच नौकरीसारखी लढाई लढता लढता खचून जातो. अशावेळी संभाजी महाराज नक्की आठवले पाहिजेत. सुरुवातीला उल्लेख केला तसं जग काय म्हणेल हा तर मोठा प्रश्न असतो. संभाजी महाराजांना त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या नंतरही बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न झाले. ट्रोलिंगसारखाच प्रकार होता तो. संभाजी राजांनी त्यांच्या हयातीत या गोष्टीत लक्ष घातलं नाही. शेवटपर्यंत लढत राहिले. शेवटी औरंगजेबाशी लढताना त्यांच्या टीकाकारांना उत्तर मिळालं. स्वराज्यासाठी त्यांच्याएवढ मोठं बलिदान कुणी दिलं? त्यानंतरही त्यांच्यावर काही विकृत मानसिकतेच्या लोकांकडून टीका होत राहिली. टीका करणाऱ्यांना आज कुणी ओळखत नाही. देश ओळखतो तो संभाजी राजांच्या पराक्रमाला. संभाजी राजे म्हणजे चमत्कार नव्हते. माणूस होते. माणूस म्हणून त्यांचा फार विचार झालेला दिसत नाही. वयाच्या नवव्या वर्षी तहाचा भाग म्हणून शत्रूच्या छावणीत रहायची वेळ येणं ही साधी गोष्ट नाही. आजकाल घरून दोन जोडी कपडे आणि शंभर रुपये घेऊन आलो आणि उद्योगपती झालो अशा गोष्टी सांगणारे पण खूप संघर्ष करणारे आणि आयुष्याला प्रेरणा देणारे म्हणून मिरवतात. पण संभाजी राजांची गोष्ट माणूस म्हणून समजून घेतली तर कळेल त्यांनी किती थरारक आयुष्य जगलय. शिवाजी महाराज मोहिमेवर असताना राज्याचा कारभार खूप कमी वयातल्या संभाजी राजांवर असायचा. आजी जिजामाता मार्गदर्शन करायला होत्या. पण जवाबदारीची जाणीव नाही तर प्रत्यक्ष जवाबदारी त्यांना खूप कमी वयात पार पाडावी लागली. आग्र्याची सुटका म्हणून जी गोष्ट आपल्याला माहितीय ती गोष्ट जरा संभाजी महाराजांच्या बाजूने विचार करून बघितली पाहिजे. आपल्या वडलांबरोबर हिटलरच्या छळ छावणीत अडकलेला एक ज्यू मुलगा आणि त्याचे आई वडील यांची गोष्ट असलेला एक सिनेमा आहे. लाईफ इज ब्युटीफुल. ऑस्कर मिळवलेला अतिशय सुंदर सिनेमा. अशी काही गोष्ट खरतर आग्र्याच्या सुटकेच्या प्रकरणावर होऊ शकते. पण आपण ती फक्त शिवाजी महाराजांच्या विषयाने पाहतो. त्या गोष्टीकडे तेंव्हा वयाने लहान असलेल्या संभाजी महाराजांच्या दृष्टीकोनातून पहायला पाहिजे. फक्त सिनेमा म्हणून नाही. एक समजूतदार, धाडसी आणि आज्ञाधारक मुलाचा तो प्रवास आहे. तिथूनही महाराज धोका नको म्हणून एकटेच पुढे गेले. नंतर काही दिवसांनी संभाजी राजे स्वराज्यात परतले. काळजी घेणारे लोक सोबत असले तरी आपले वडील आपल्याला एकटे सोडून जाताहेत तरी स्वराज्यासाठी ते समजून घेणे हे लहान वयात खूप अवघड असतं. शिवाजी महाराजांचा दबदबा आणि नाव यामुळे संभाजी राजांना जाणीव तर होतच असणार की आपले वडील काहीतरी महत्वाचं काम करताहेत. तरीही त्याकाळचा जंगलातला प्रवास आणि शत्रूचा धोका याची कल्पना करून संभाजी महाराजांचा आग्र्याहून परत येण्याचा अनुभव आपण विचारात घेतला पाहिजे. हे प्रश्न आपल्याला सहसा पडत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट पराक्रमी, प्रसिध्द आणि लोकप्रिय पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांची होणारी अडचण. नेहमी उदाहरण दिलं जातं की मोठ्या माणसांची मुलं सहसा फार पराक्रमी, विद्वान होत नाहीत. पण संभाजी महाराज केवळ योगायोगाने या समजाला अपवाद नव्हते. पराक्रमाचा विषय निघाला की शिवाजी महाराजांच्या जोडीला संभाजी महाराजांचं नाव घ्यावच लागतं. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. सततच्या लढाया, चोहोबाजूने असलेले शत्रू या गोष्टींचा विचार केला तर त्यांच्या मानसिक खंबीरपणाला दाद द्यावी लागेल. सतत विरोधात कारवाया करणारे मंत्रीमंडळातले सहकारी असतानाही त्यांनी ज्याप्रकारे स्वतःला स्वराज्याच्या लढाईत पूर्ण जोमाने झोकून दिलं ते कौतुकास्पद आहे. संभाजी राजांची आठवण जयंती, पुण्यतिथीच नाही तर कुठल्याही अडचणीच्या वेळी सुद्धा करायला पाहिजे. संकटावर मात करण्याची, निराशा झटकण्याची प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी त्यांच्या जीवनात आहेत. कधी डोकं टेकवायची इच्छा झाली तर रायगड आठवतो. शिवाजी महाराज आठवतात. पण आपण कधी निराश झालो, अडचणी आल्या की संभाजी महाराज आधी आठवतात. संकट संपायच नाव घेत नाही, शत्रू वाढत जातात, आपल्या आसपासचीच माणसं पाय खेचू लागतात, बदनामी करू लागतात किंवा कुठलीही अडचण असू द्या. संभाजी महाराजांची आठवणही खूप बळ देऊन जाते. आणि ज्यांची आठवण सुद्धा बळ देऊन जात असेल त्यांच्यापेक्षा मोठा पराक्रमी माणूस कोण असेल? कितीही मोठे प्रश्न निर्माण झाले तरी त्यांचं आयुष्य आठवून बघा. संभाजी महाराज उत्तर आहेत. अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *