प्रिय शिवाजी महाराज

March 5, 2018

लेखन

arvind jagapat patra

प्रिय शिवाजी महाराज,

प्रिय शिवाजी महाराज,
तुमची जयंती जोरदार साजरी होते. १९ फेब्रुवारीला आणि तिथीनेपण. गर्दी कमीजास्त असेल. पण तुमच्याविषयी आदर आहे. दोन्ही दिवशी. खरंतर तुमच्यावर प्रेम दाखवण्याची स्पर्धा आहे. मनापासून वाटतं की हे ३६५ दिवस दाखवलं गेलं पाहिजे. तुमचं नाव घ्यायचं नाही तर कुणाचं नाव घ्यायचं? असे किती राजे आहेत या देशात ज्यांनी शेतकरी समजून घेतला? ज्यांना झाडाचं महत्व होतं? किती राजांना आरमार किती महत्वाचं होतं हे लक्षात आलं? सात आठ राजे आहेत इतिहासात ज्यांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात तुमचं नाव खूप महत्वाचं आहे. म्हणून मला तुमची जयंती दोनदा साजरी होते हे खटकत नाही. तुमची जयंती रोज साजरी झाली पाहिजे. कारण तुमचे विचार अजूनही याकाळात कुठल्याही नेत्याने आत्मसात केलेले दिसत नाहीत. त्यांना थोडं शहाणपण यायला हवं.

महाराज, वाईट याचं वाटतं की तुमच्या नावाने तुमचे मावळे भांडत असतात आजकाल. त्यांना सांगा हो. ज्या राजाने स्वराज्य दिलं त्या राजाला एका गटाचं किंवा पक्षाचं करण्याची हिंमत कशी होते या लोकांची? राजे सगळ्यांचे आहेत. मेंदू स्वतःचा असेल तर गडावर या. मेंदू कुणाला चेंडू म्हणून खेळायला दिला असेल तर गडाच्या पायथ्याशी पण फिरकू नका असं सांगायची वेळ आलीय महाराज. महाराज मला सांगा तुमचा मावळा शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात म्हणून काम करणारा हवाय का कुणाच्यातरी मागे बिनडोकपणे हिंडणारा हवाय? महाराज तुम्ही सांगा तुम्हाला विनाकारण तुमच्या नावाने हाक दिली की कुठेही जाणारा मावळा हवाय? का आपलं गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी झटणारा मावळा हवाय? मला खात्री आहे तुम्हाला गावासाठी काम करणारा मावळा जास्त आवडेल.

कुठलाच मराठी माणूस कुणाचा तरी चेला म्हणून तुमच्या पायाशी आलेला तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. तुमच्या गडावर यावं तर स्वाभिमान ठेऊन. स्वतःच स्वतःचा मालक म्हणून. स्वतःच्या मेंदूला स्वतः आज्ञा देणारा माणूस तुमच्याकडे आला पाहिजे. पण दुर्दैवाने स्वतःचा मेंदू स्वतःच्या ताब्यात असणारे किती लोक आहेत? आदेशावर काम करणारे रोबो जास्त झालेत. एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे रोबो. बटन दाबलं की सुरु. जीवाभावाची माणसं आत्महत्या करताहेत, नौकरीचा प्रश्न आहे, लग्नाचा प्रश्न आहे, हुंड्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आई बापाच्या सहवासात राहून मिळतील. शाळा, कॉलेज मधल्या मास्तरच्या नादाला लागून मिळतील. बाकी कुणाच्याच नादी लागून मिळणार नाहीत. अडचण गावातली आहे. गावातच उपाय सापडेल. बाहेर नाही. वर्तमान एवढ भयंकर आहे त्यावर माथेफोड करायची सोडून इतिहासावर भांडणं लावण्यात नेते मग्न आहेत

महाराज तुम्हाला जिजाऊची शिकवण पुरेशी होती. शहाजी राजांची दूरदृष्टी महत्वाची होती. तुम्ही नेतृत्व केलं. कुणाच्या मागे जायची गरज पडली नाही. मग तुमचे मावळे असे कुणाच्या तरी नावाचा टिळा लावून किंवा कुणाचा तरी झेंडा घेऊन का फिरतात? हे असे वैचारिक गुलाम का झालेत? ज्या मराठी माणसाला शिवाजी महराजांचं विचारधन वारसाने रोख मिळालंय तो आपला मेंदू उधार कसा ठेऊ शकतो?यांना खरच तुमचं चरित्र माहित आहे का? किमान यांच्यासाठी तरी महाराज, शिवजयंती रोज झाली पाहिजे. दोन दिवसात फक्त वाद घालतात लोक. शुभेच्छा द्यायला वेळ मिळत नाही लोकांना. असं वाटतं सांगावं की करू द्या तिथीने जयंती. काही अवमान तर करत नाहीत. बरं जे तिथीनुसार जयंती साजरी करतात त्यांना काय प्रश्न विचारणार? औरंगाबादचं संभाजीनगर नाव का नाही झालं या प्रश्नाचं पण उत्तर देता येणार नाही त्यांना. बाकी जुना इतिहास त्यांना काय विचारायचा? करतात तर करू द्या. फक्त शिवजयंतीवरून तरी मराठी माणसाने भांडू नये असं वाटतं. महाराज तानाजी असोत, बाजीप्रभू असोत, वेडात दौडलेले सात वीर मराठे असोत, शिवा काशीद असोत किंवा आंग्रे असोत. तुमच्या काळातल्या प्रत्येकाला त्याचं श्रेय मिळालं. त्याचं पद मिळालं. पण आज या मावळ्यांना असं काय मिळालंय की हे एकमेकांच्या जीवावर उठलेत? भांडत बसलेत. एकाला तरी ओळख मिळाली का? अधिकार मिळाला का? प्रत्येकाला जिथे गरज असेल तिथे व्यवस्थित राबवून घेतलं जातंय हे मात्र शंभर टक्के खरय. एकमेकांचे डोके फोडण्याआधी यांना स्वतःचं डोकं लावण्याची बुद्धी द्या महाराज.

महाराज , यावर्षी १९ फेब्रुवारीला काही गावांनी जयंतीच्या वर्गणीतून वाचनालय उभं केलं. शाळेच्या खोल्या बांधल्या. गरीबाच्या मुलीचं लग्न लावलं. या सगळ्या बातम्या वाचताना तुमचे मावळे योग्य दिशेने चाललेत याचा किती अभिमान वाटला. तिथीलाही अशा काही गोष्टी घडल्या तर वाईट वाटणार नाही. उलट आनंद होईल.

शेवटी आम्ही एकच लक्षात ठेवलं पाहिजे. अंतर्गत भांडणामुळेच गुलामीत होतो आपण. महाराजांनी भांडणं मिटवली. लोकांना एकत्र आणलं. स्वराज्य एकत्र आल्यामुळे शक्य झालं. आज महराजांच्या नावाने आपसात भांडायला लागलो तर पुन्हा गुलामीच नशिबी येईल. म्हणून कुणी तिथीला जयंती करत असला तरी गौरव तर आपल्या राजाचाच आहे. बाकी छीदमचं काय होतं ते देशाने पाहिलंय. कारण मराठी माणूस एक असतो महाराजांचा विषय आला की. असेच एकत्र राहूया. कारण महाराजांनी स्वराज्य कुणाच्याही मागे बोंबलत हिंडणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी तर नक्कीच दिलं नसेल. स्वतःचा मेंदू असलेले मावळे घडवायचे असतील. जे आंग्रे यांच्यासारखं आरमार घडवतील. म्हणून आता आम्ही ठरवलंय महाराज, कुठल्या नेत्यांच्या इशाऱ्यावर भांडत बसण्यापेक्षा तुमच्या नावाने एक राहू. आपल्या बळीराजासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या देशासाठी.

अरविंद जगताप

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *