जगातील पहिले वृक्षसंमेलन

February 2, 2020

लेखन

arvind jagapat patra

बीडचं वृक्षसंमेलन कशासाठी?

बीडचं वृक्षसंमेलन कशासाठी?

मित्र बीडला जातात. बीडकडून जातात. प्रत्येकवेळी सांगतात झाडच दिसत नाहीत तुमच्या भागात. ऐकून घेत आलो कॉलेजमध्ये असल्यापासून. आपला भाग भकास आहे असं तोंडावर सांगतात लोक आणि आपण ऐकून घेतो. कधी राजकारण्यांना शिव्या देतो. कधी निसर्गाची कृपा नाही म्हणतो. काहीतरी केलं पाहिजे असं नेहमी वाटत राहतं. पण काय करायला पाहिजे हे कळायला खूप वर्ष जावी लागली. उत्तर सोपं होतं. झाडं कमी आहेत तर झाडं लावली पाहिजेत. डॉक्टर सांगतात पेशंटला कॅल्शियम कमी आहे. मग पेशंट कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. साखर वाढलीय. मग पेशंट गोड कमी खातो. आपले आजे पणजे निसर्गाचे डॉक्टरच होते. झाडं कमी झाले म्हणायचे. पण आपण ऐकलं नाही. कारण त्यांच्याकडे डिग्री नव्हती डॉक्टरसारखी. कळत असूनही आपण शांत. मग सयाजी शिंदे यांच्या सोबत सातारा, मानदेश भागात जाण्याचा योग आला. तिकडे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून झाडं लावायचा उपक्रम चालू होता. हे काम आपल्या भागात व्हावं अशी इच्छा होती. एकदा सायाजीरावाना माझ्या पाडळशिंगी गावात घेऊन आलो. लोकांचं बघून बघून आपल्या गावात काही काम व्हावं अशी इच्छा होती. सयाजीरावांनी बीडमध्ये माझ्या गावात झाडं लावायला मदत केली. रोपं दिली. शाळेतल्या पोरांनी रोपं जगवली. शाळेतले पोरं आणि शिक्षक मन लावून झाड जगवतात. तरीही झाडाचं प्रमाण कमी आहे. एक गोष्ट लक्षात आली की झाडांना जर मतदानाचा हक्क असता तर माझा देश हिरवागार असता. असो. 

सयाजी शिंदे गावी आले होते तेंव्हा आमचा मित्र शिवराम घोडकेने बीड जवळ पालवणला वन विभागाची एक जमीन दाखवली. त्यावेळी सातपुते साहेब होते वन विभागाचे अधिकारी. देवराई काय असते. देवाच्या नावाने जंगल. जिथे कुऱ्हाड चालवली जात नाही. देवाचं जंगल. आता वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे तुकाराम आपले झाडावर प्रेम करणाऱ्या लोकांचे देव. त्यांच्या अभंगांची आठवण काढणारी देवराई करायचीय बीडला. शिवराम घोडके सारख्या मित्रांसोबत एक स्वप्न पाहिलं होतं. आपल्या बीडमध्ये एक पर्यटन स्थळ पाहिजे. जिथे फिरायला जाऊन लोकांना आनंद झाला पाहिजे. समाधान वाटलं पाहिजे. डॉक्टर प्रदिप शेळके, ड्रोनाचार्य राजू शिंदे, अनिल धायगुडे यांच्यासारख्या मित्रांनी आणि आताचे नवे वनअधिकारी तेलंग साहेब यांनी मन लावून काम केलंय. आमच्या बीडात आलात तर झाड नाही असं तुम्ही म्हणणार नाही. लोक सकाळी चालायला येतात. एकमेकांना देवराईविषयी सांगतात. देवराईत आता रॉक गार्डन करतोय आपण. किशोर ठाकूर नावाचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिल्पकार हे सगळं डिझाईन करताहेत. रंगमंच उभा राहतोय. बीडमध्ये एक सुंदर पर्यटन स्थळ असायला पाहिजे हे फक्त स्वप्न होतं. सयाजी शिंदे, शिवराम घोडके, वन विभागाचे कर्मचारी आणी सह्याद्री देवराईचे वनस्पती अभ्यासक सुहास वायंगणकर, ढोले सर, निंबाळकर सर, मधु फल्ले, महेश नामपूरकर, सचिन चंदने. जयंत ठाकूर यांची सगळी मेहनत आहे. आता आपण वृक्षसंमेलन आयोजित करतोय. बाहेरून माणसं येतात. काम करतात. आता बीडच्या मित्रांनी जवाबदारी उचलावी. सोबत या. स्थानिक झाडं महत्वाची असतात तेवढीच स्थानिक माणसंसुद्धा. वृक्षसंमेलनाच्या निमित्ताने आपण फक्त पालवण नाही सगळा मराठवाडा हिरवागार करूया. सयाजी शिंदे स्वतः आनंदाने येतात. सोबत पश्चिम महाराष्ट्रातली खूप माणसं येतात. त्यांना अभिमान असतो सांगली कोल्हापूरच्या पुरासारख्या संकटात बीड सारख्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्याने भरघोस मदत पाठवली. असेच एकमेकांच्या सोबत उभे राहू. उमेदवार उभे राहून आजवर फार काही घडलं नाही. आता आपल्यासारखी सामान्य माणसं उभी राहिली पाहिजेत. निवडणुकीत नाही. मैदानात. आणि आपल्यासोबत झाडं उभी राहिली पाहिजेत.

वृक्षसंमेलन पिकनिक नाही. पाणीटंचाई असताना देशी झाडं टिकवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे पाहता येईल. इथे झाडे जगू शकतात तर आपण सहज झाडं जगवू शकतो हा आत्मविश्वास येईल. महाराष्ट्रात झाडांसाठी, पाण्यासाठी, पर्यावरणासाठी खूप तज्ञांना ऐकता येणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारता येणार आहेत. झाडावर प्रेम करणाऱ्या माणसांनी एकमेकांशी भेटावं, आपने अनुभव सांगावेत, इवले इवले पक्षी बिया गावोगाव पोचवतात. कुठलेच श्रेय न घेता. तशी माणसांनी झाडं पोचवावीत. बीडच्या जवळपासच्या लोकांनी नक्की यावं. बाकी प्रत्येक जिल्ह्यात आपण हे संमेलन भरवणार आहोत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *