झाड

January 9, 2016

लेखन

arvind jagapat patra

झाड

झाड

एका कवीने कविता लिहिलीच नाही
कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर
कागद काळे करण्यापेक्षा वडाच
एक झाड लावू असं ठरविले त्याने
दरम्यान                                                                                          
समकालीन कवितेच खूप पीक आलं
प्रायोगिक वगैरे कवितांच.
त्याच्या वडाची दखल मात्र
कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही.
समकालीन कविता तिसऱ्या दिवशी
फुटाण्याच्या पुडीसाठी शहीद झाली.
वड मात्र हिरवागार आहे अजूनही.
रोज पक्ष्यांच संमेलन भरत चुकता.
वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो
हे आपलं पुस्तक आहे.
लोक हसतात आणि म्हणतात
ह्याला काही सुचत नाही.
कवी झाडाखाली वाचत असतो
हजारो पुस्तकं,
कधी
अचानक सुचल्यासारख कवी उठतो.
आता कविता लिहिणार असे वाटत.
पण कवी जातो बांधावर
आणि लावतो आणखी एक झाड.
गावात त्याला कोणी कवी म्हणत नाही
कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही.
पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर
सुरु झाली पक्ष्यांची किलबिल
तर नीट लक्ष देवून ऐका
तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल.
कवी झाडाला पुस्तक म्हणतो
कारण त्या पानांमध्ये
खूप काही देण्याची ताकद आहे.
ही पान वाळायच्या आत
चाळायला हवीत.
हिरव्यागार कवितेसाठी.
अरविंद जगताप

गोष्ट छोटी डोंगराएवढी पुस्तकावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया

सुरवंट दिवसेंदिवस पान कुरतडत असतं आणि मग कधीतरी त्याचं फुलपाखरू बनतं. फुलपाखरू व्हायचं स्वप्न प्रत्येकाचंच आहे. पण तोवर आपण पानं कुरतडत राहिली पाहिजेत.
https://www.arvindjagtap.com/memory-card/

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *